जय जय विश्वपते, हिमाचलसुते, सत्यव्रते भगवते ।

 


जय जय विश्वपते, हिमाचलसुते, सत्यव्रते भगवते ।

वांच्छा कल्पलते, कृपार्णव धृते, भक्तांकिते, सन्मते ॥

साधू वत्सलते, अधर्मरहिते, सद्धर्म श्रीपालके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥१॥

अष्टादंडभुजा प्रचंड सरळा, विक्राळ दाढा शुळा ।

रक्त श्रीबुबुळा प्रताप अगळा, ब्रह्मांड माळा गळां ॥

जिव्हा ऊरस्थळा, रुळे लळलळा, कल्पांत कालांतके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥२॥

कोटीच्या शतकोटि बाण सुटती, संग्राम प्राणार्पणें ।

तेंवीं रुप प्रचंड देख भ्रमती, मार्तंड तारांगणें ॥

सोडीले तव सुप्रताप पाहतां, गर्वास श्रीत्र्यंबके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥३॥

युद्धीं चाप करीं फिरे गरगरा, चक्रापरी उद्भिटा ।

आरोळीं फुटता धरा थरथरा, कांपे उरीं तटतटा ॥

साक्षात्‍ काळ पळे बहू झरझरा, धाकें तुझ्या अंबिके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥४॥

अंगीं संचरतां सकोप उठती, ज्वाला मुखीं भडभडा ।

भूमी आदळतां द्विपाद उठती, शैले - मुळें तडतडा ॥

चामुंडे उररक्त तूं घटघटा, महिषासुर प्राशके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥५॥

आशापाश नको, जगीं भिक नको, परद्रव्य दारा नको ।

कायाक्लेश नको, दया त्यजुं नको, निर्वाण पाहूं नको ॥

कामक्रोध नको, महारिपु नको, निंदा नको या मुखें ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥६॥

त्वदभक्ती मज दे, भवानि वर दे, पायीं तुझ्या राहुं दे ।

सद्धर्मीं मति दे, प्रपंचिं सुख दे, विघ्नें दुरी जाउं दे ॥

धैर्य श्री बल दे, सुकीर्ति यश दे, बाधो न दे पातकें ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥७॥

स्वापत्या छळणें कृपा विसरणें, अश्लाध्य कीं हें अहा ।

तूझा तूंचि पहा विचार करुनी, अन्याय कीं न्याय हा ॥

विष्णूदास म्हणे कृपाचि करणें, आतां जगन्नायके ।

साष्टांगें करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ॥८॥

Comments